संत श्री. ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कारशिबिर २०२४ महिरावणी
“संत श्री ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कार शिबिर” दि. १६ मे २०२४ ते २९ मे २०२४ या कालावधीमध्ये ‘ग्लोबल प्रॉस्पेरिटी फाऊंडेशन’ तर्फे माऊली निवास, दुडगाव रोड, महिरावणी आयोजीत करण्यात आले. या शिबिरामध्ये योगासने, बोधकथा, स्तोत्र, श्रीमदभगवद्गीता, वारकरी सांप्रदाय पारंपारिक चालीतील अभंग, भूपाळ्या व गौळणी, संस्कृत-संभाषण, शास्त्रीय संगीतातील अलंकार, टाळ, ठेका, संवादिनी, मृदंग व संगणक-शिक्षण दिले गेले.
ज्ञानयोगी गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे, आळंदी (देवाची) व निष्काम कर्मयोगी श्री शिवराम महाराज म्हसकर, पिंपळद (घोलपाचे) यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नाशिक येथील महिरावणी गावात संत श्री. ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कारशिबिर ‘ग्लोबल प्रोस्पेरिटी फाउंडेशन’ च्या वतीने आयोजित केले जाते. या शिबिरामध्ये परिसरातील दहा ते एकवीस वयोगटातील विद्यार्थ्यांना योगासन-प्राणायाम, बोधकथा, स्तोत्र, श्रीमदभगवद्गीता, वारकरी पारंपारिक चालीतील अभंग, भूपाळ्या व गौळणी, संस्कृत-संभाषण, शास्त्रीय संगीतातील अलंकार, टाळ, ठेका, संवादिनी, मृदंग व संगणक-शिक्षण दिले जाते. विद्यार्थीच सर्वांची आवड-निवड लक्षात घेऊन आपला अभ्यासक्रम व दिनचर्या ठरवितात, विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवितात. विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सर्व कामे वाटून घेतात आणि जबाबदाऱ्या पार पाडतात. इथे शिक्षकांना पगार नाही व विद्यार्थ्यांना फी नाही. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शारीरिक व सांस्कृतिक शिक्षणासोबतच शिबिरार्थींचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, आधुनिक तंत्रज्ञांची योग्य ती ओळख व उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही उत्स्फूर्तपणे अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, योगदान देतात. मंगळवार, दिनांक २८ मे २०२४ रोजी शिबिराच्या सांगता कार्यक्रमासाठी थोर शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्याने मुले आनंदाने उड्याच मारू लागली. ज्यांना आजवर केवळ पुस्तकात किंवा टीव्हीवरच बघितले होते, त्यांना प्रत्यक्ष पाहण्या-ऐकण्याची संधी मिळणार म्हणून मोठया संख्येने शिबिरार्थी व पालक उपस्थित होते. जेंव्हा अमेरिकेने भारताला कम्प्युटर देण्यास नकार दिला त्यावेळी भटकर सरांनी भारतासाठी स्वतःचा कम्प्युटर बनविण्याचा निर्णय घेतला आणि आपले स्वप्न सत्यात उतरविले. त्यांच्या संशोधनामुळेच आज आपल्या देशाने संगणक, स्वाफ्टवेअर, आयटी क्षेत्रात प्रगती केली, त्यांच्यामुळेच आज आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. रंगीत दूरदर्शन, एज्युकेशन टू होम, ब्रॉडबँड अशा अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचे जनक यांचे विचार किती थोर आहेत पण त्यांची राहणी किती साधी आहे याचा अनुभव प्रत्येकाच्याच ओठावर होता. सर देखील मुलांच्या कुतुहलामध्ये रमून मुलांसारखेच झाले. सकाळपासून मुलांमध्ये रमलेले सर दुपारच्या जेवणाचीही वेळ विसरून गेले. विद्यार्थीही सरांना बिलगून होते आणि सरांचाही पाय शिबिरातून निघत नव्हता. सरांच्या सहवासाने मंत्रमुग्ध झालेली ती सकाळ, मंतरलेले ते क्षण विद्यार्थी आपल्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. भविष्यात तंत्रज्ञान खूप विकसित होईल, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवास आव्हान ठरेल, अशावेळी मानवाने उत्तम शिक्षणासोबतच सुसंस्कारित होऊन आपली सद्सदबुद्धी, विवेक जागृत ठेवणे आवश्यक असेल आणि मानवी मुल्यांवर आधारित असलेल्या इंडियन क्नॉलेज सिस्टमच्या प्रार्श्वभूमीवर, उद्याच्या जगाला दिशा देण्याचे उत्तरदायित्व भारतीय युवकांवर आहे असे उद्गार डॉ. विजय भटकर यांनी काढले. त्यासाठी आपण नेमके कोण आहोत? आपल्या जीवनाचे नेमके प्रयोजन काय? आपण अर्थपूर्ण जीवन कसे जगू शकतो? स्वतःचे व इतरांचे जीवन सुखमय कसे करू शकतो? या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा समग्र विचार सर्वानी करण्याचे आवाहन सरांनी केले. विद्यार्थी व पालक यांनी शिबिरातील विविध अनुभव कथन केले. शेवटी शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप झाले आणि ‘स्व’च्या पद्धतशीर आणि वैज्ञानिक चौकशीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण नकाशांसह, आयटीतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले, कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या इन्फोग्राफिक्स इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर सरांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरातील फोटोंसाठी लिंक https://photos.app.goo.gl/Z6PSurE4DRiiAgKQ9
बालसंस्कार शिबीर महिरावणी – विठ्ठल नामाची शाळा भरली Balsanskr Shibir – Mahiravani Vitthal Namachi.. #mahirvani #महिरावणी #khandbahale #muktakhandbahale