१४ मे २०२३: नुकत्याच झालेल्या, जागतिक मातृदिन व संत मुक्ताबाई समाधी दिनानिमित्त ह. भ. प. कु. मुक्ता सुनील खांडबहाले हिने बेलगाव (ढगा) येथे हरिनाम सप्ताह या कार्यक्रमात संत मुक्ताबाईंचे चरित्र व “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या विषयावर अभंगांसह निरूपण केले. मृदूंगाची साथ तिचा भाऊ श्रीराम सुनील खांडबहाले याने केली.
जागतिक दिनानिमित्त ५ महिलांना ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वाटप सौ. मीराबाई शिवाजी खांडबहाले यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. अण्णा महाराज आहेर, अशोकनगर यांची विशेष उपस्थिती होती. महिरावणी ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळाचे श्री. निवृत्ती खांडबहाले, श्री दत्तू खांडबहाले, श्री शिवाजी खांडबहाले, श्री. गोटीराम खांडबहाले, तसेच बेलगाव (ढगा) ग्रामस्थ श्री दिगंबर ढगे, रामभाऊ ढगे, दत्तू ढगे, अशोक ढगे, ज्ञानेश्वर मते, डॉ. कविता चव्हाण व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे ई.स. १२७९ साली झाला. या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. रुख्मिणी आणि विठ्ठलपंत हे आई-वडील. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले. “आठ वर्षाची मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची अध्यात्मिक गुरु बनली.” संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ११ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी ताटीचा दरवाजा उघडावी म्हणून विनवणी केली आहे. मुक्ताईने ज्ञानेश्वरांना, आदिनाथांपासून गहीणीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती, ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे स्मरण दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्निला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग.
योगी पावन मनाचा । साहे अपराध जनांचा ।। विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ।। शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।। विश्वपट ब्रम्हदोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।
हे समजवताना ती म्हणते, आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात, अपेष्टा सहन कराव्या लागतात,
हात आपुला आपणा लागे । त्याचा करू नये खेद ।। जीभ दातांनी चाविली । कोणे बत्तीशी पाडिली ।। चणे खावे लोखंडाचे । मग ब्रह्मपदी नाचे ।।
भावाला समजवण्याच्या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना. तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते,
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्द्ल ठायीचे ठायी ।। तुम्ही तरूनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।
ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतरच्या आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. अध्यात्माचा पाया त्यांनी रचला.
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारले देवळाया ।।
संत मुक्ताबाईंचे निर्वाण व समाधी – “तेज तेजासी मिळाले”.
संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृतिनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. १२ मे १२९७ रोजी ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या. मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येते आहे.
कु. मुक्ता खांडबहाले हिने आळंदी (देवाची) साधकाश्रम येथील गुरुवर्य ह. भ. प. श्री. किसन महाराज साखरे यांच्याकडे सांप्रदायपूर्वक अध्यात्मिक अध्ययन केले असून संत मुक्ताबाई यांचे चरित्र वर्णन केले. संत अवतार हे सकल जगाच्या कल्याणासाठी असतात, संतांचे चरित्र हे साधकाचे साधन असते म्हणून संत विचाराचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी महिरावणी येथील इयत्ता १० वीमध्ये शिकणारी कु. मुक्ता खांडबहाले प्रयत्नरत आहे.